Friday, 27 May 2016

समुद्र स्वच्छता अभियान

एक नेहमी दिसणारं चित्र आठवा, सुंदर उंच डोंगर, त्यावर हिरवीगार झाडं, वर दिसणारं निळं आकाश, त्यातले काळे पांढरे ढग, थंड हवा
आणि जोडीला भरपूर सारा सर्व प्रकारचा कचरा!!!!!

थोड्याच दिवसांत हेच दृष्य समुद्राच्या तळाशी पण बघायला मिळेल 

हि दुर्दैवी वेळ आपल्यावर उशिरात उशिरा यावी म्हणून काही वेडे लोक काम करत असतात, 
२ मे २०१६ रोजी बाराकुडा डायव्हिंगचे व्यंकटेश चार्लू यांनी त्यांचे सर्व सहकारी, काही निसर्गप्रेमी, आमच्यासारखे विद्यार्थी, उत्साही लोक या सर्व जणांना हाताशी घेऊन लोकजागृतीसाठी एक मोहीम ठरवली. बोट घेऊन जवळच्याच एका बेटावर जायचं, बेटाचा किनारा, आसपासचा समुद्रतळ साफ करायचा आणि उचलून परत आणून योग्य विल्हेवाट लावायची, अस साधारण स्वरूप होतं या मोहिमेचं. प्रतिसाद उत्तम मिळाला
आता प्रश्न येईल की हा कचरा समुद्राचं, प्राणी, पक्षी, जलचर आणि आपलं माणसांच नुकसान कशा प्रकारे करतो ,
कोणताही कचरा नष्ट होण्यासाठी तो कुठल्या न कुठल्या रुपात जीवाणु, बुरशी, किडे, छोटे प्राणी अश्या कोणत्या न कोणत्या जीवाचं खाद्य बनावं हे गरजेचं असतं, प्लास्टिक, थर्माकॉल ह्या सर्व गोष्टी नैसर्गिक नसल्यानं कोणताही जीव ते खाऊ शकत नाही आणि त्या परिसरात तश्याच पडून राहतात. थोड्या वेळासाठी नव्हे तर शेकडो वर्षं !
याच प्लास्टिक, थर्माकॉलचे नंतर छोटे छोटे तुकडे होतात आणि अन्न समजून छोटे मासे, प्राणी ते खातात. 
हेच मासे तुम्ही बाजारातून ते आणुन खाल्लेत तर तुम्हीहि प्लास्टिक खाताय हे निश्चित. 
जर चांगले मासे खायचे असतील तर समुद्रात कचरा टाकायचा बंद करा.
बाटल्या, जाळ्यामध्ये अडकून आजवर कित्येक कासवं, सील, समुद्री पक्ष्यांचा मृत्यु झालेला आहे . 
हे कासव लहानपणी एका प्लास्टिकच्या रिंगमध्ये अडकलं होतं, बाकी शरीराची वाढ झाली पण रिंग मुळे पाठीचा काही भाग तसाच राहिला आणि आकसत गेलं, पुढे शरीराची वाढ नीट  न झाल्यानं हा बिचारा मरून गेला 



हा एक दुसरा बिच्चारा प्राणी, रिंग गळ्यात अडकून नकळत गळफास लागला ह्याला 
चुक कोणाची  शिक्षा कोणाला ?


आता थोडे मोहिमेचे तपशील,
अगदी छोटासा भाग खरं तर आम्ही मोहिमेसाठी निवडला होता पण त्यात सुद्धा इतका कचरा निघाला क मन विषण्ण झालं! १५ पोती भरून कचरा त्या दिवशी आम्ही काढला, कचऱ्याचा प्रकार किती काढला ते खाली देतोय,

प्लास्टिक बाटल्या, डबे व कॅन   ३
 काचेच्या बाटल्या                   ४
युज ॲंड थ्रो डिश व कागद      १
थर्माकॉल व स्पंज                   २ 
 धातूचे कॅन                           ३
रबर व चप्पला                       १
कपडे                                    १
व्यंकटेशचं खास कौतुक केला पाहिजे एका गोष्टीसाठी, इतर सर्व ठिकाणी स्वच्छता करताना लोक सर्रास प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्या वापरतात, पण व्यंकटेशनं मात्र ह्या वर्षी ज्यूटची आपण नेहमी धान्य भरायला वापरतो तसली पोती आणली होती, प्लास्टिक पिशव्या टाळण्यासाठी केलेली स्तुत्य कृती. 
इतकं करूनही काही गोष्टी असतात ज्या आमच्या हातात नाहीत, उदाहरणार्थ नावांमधून गळती होऊन किनाऱ्यावर आलेला ग्रीस आणि डिझेलचा प्रचंड तवंग, प्रवाळ, मासे, छोटे प्राणी सर्वांनाच घातक ठरणारा 
खालच्या फोटोमध्ये नावेजवळ ज्या काळ्या रेषा दिसत आहेत ते सर्व तेल आहे,


तेलाच्या तवंगाहुनही अधिक भयंकर अश्या काही गोष्टीदेखील सापडल्या,



पण मित्रांनो,
आमचे प्रयत्न तोकडे आहेत, एका दिवशी तास दीड तास केलेली स्वच्छता फक्त लोकांना समजवायला कामाची आहे. खर उददेश हाच कि लोकांनी समुद्र स्वच्छ ठेवायला शिकावं !
जेंव्हा केंव्हा पुढच्या वेळेस समुद्रावर जाल तेंव्हा प्रयत्न करा की आपल्यामुळे काहीही कचरा पसरणार नाही, इतकीच एक माझी विनंती ऐकलीत तर व्यंकटेश, त्याचे सहकार्यांच्या प्रयत्नाला यश आलं असा अर्थ होईल 

Wednesday, 4 May 2016

टेड-ज्ञानाचा खजिना

TED टेड Technology Entertainment Design 

तंत्रज्ञान, मनोरंजन आणि डिझाईन (याला एक मराठी शब्द आहे, 'प्रारूप' असा, पण टाळतो)
१९८४ मध्ये रिचर्ड वर्मन नावाच्या अवलीया स्थापत्यशास्त्रीनं जगाला, तुम्हाला, मला दिलेली एक जबरदस्त देणगी म्हणजे टेड. आज टेड जगभरच्या लोकांना व्हिडियोच्या माध्यमातून ज्ञानप्रसार करणारी वेब साईट आहे, अगदी आपण रोज वापरतो त्या युट्यूब सारखी. सुरुवात झाली तेंव्हा टेड फक्त एक परिषद होती, तंत्रज्ञान, मनोरंजन आणि डिझाईन वर बोलणारी पण सुरुवातीला काही तर गणित चुकलं आणि हा रिचर्ड तोंडघशी पडला, पण पडूनही पुन्हा उठला. परत उठायला पठ्ठ्यानं सहा वर्षं घेतली, ह्यावेळी सोबतीला एक मित्र घेतला हॅरी मार्क्स आणि परत खेळ मांडला आणि यावेळी मात्र यशस्वी ठरला. जगानं टेड स्वीकारलं! आजही टेडकडुन जगभरात वेगवेगळ्या विषयांवर परिषदा घेतल्या जातात. भारतात पण कित्येक ठिकाणी आणि कित्येक विषयांवर आज वर टेड परिषद झाल्या आहेत. 
                            टेडची मला स्वतःला प्रचंड आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांची नावा बरोबर दिसणारी ओळ,
IDEAS WORTH DISCUSSING  (चर्चा करण्याजोग्या कल्पना)
नंतर त्याच ठिकाणी दिसतं, IDEAS WORTH DISCUSSING OR CHALLENGING OR SPREADING
म्हणजे तुम्ही आमच्यावर टीका करू शकता, आमच्याबद्दल चर्चा करू शकता आमच्याबद्दल इतरांना सांगू शकता पण आम्ही दुर्लक्ष करण्याजोगे नाही. 

"जे जे उत्तम उदात्त उत्कट ते ते घ्यावे" हे टेड वाल्यांनी वाचलंय कि नाही माहित नाही पण पण त्यानी आमलात जरूर आणलंय, वैद्यकशास्त्र, तंत्रज्ञान, इंटरनेट, धर्म, अध्यात्म, पुराणकथा, संगीत, रोबोटिक्स, मानव्यशास्त्र, भाषाशास्त्र, स्वच्छता, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, आंतरराष्ट्रीय राजकारण, दहशतवाद, आफ्रिका खंडाचे प्रश्न, भन्नाट लोकांनी कल्पना केलेल्या आणि यशस्वी करून दाखवलेल्या शेकडो गोष्टी, विषय कुठलाही घ्या, टेडनं स्वतःला कोणत्याच विषयाशी मर्यादित ठेवलेलं नाही. आता जर विषयांची आणि देशांची बंधनं मनात नाहीत तर भाषेची तरी का मानतील हे लोक? शंभराहून अधिक भाषांमध्ये टेड मिळेल, मराठीत पण आहे बरं का!
                रोज नवीन नवीन ज्ञान लोकांच्या समोर आणत राहायचं हा टेडचा शिरस्ता.
टेडचा कोणताही व्हिडीओ पंधरा ते वीस मिनिट पेक्षा जास्त वेळेचा नसतो, त्यामुळं कंटाळवाणा होत नाही. वक्त्यांची शैलीपण मोठी आकर्षक असते आणि भाषा खुप सोपी.
माझ्या ब्लाॅग लिहीण्यामागची प्रेरणा एका अर्थी टेंडच आहे. टेडवरच्या माझ्या काही अत्यंत आवडत्या व्हिडीओच्या लिंक  देत आहे.
तर मग आजच जा www.ted.com वर आणि प्रतिक्रीया कळवा!

https://www.ted.com/talks/bonnie_bassler_on_how_bacteria_communicate/transcriptlanguage=enough

https://www.ted.com/talks/paul_stamets_on_6_ways_mushrooms_can_save_the_world?language=en


https://www.ted.com/talks/melissa_marshall_talk_nerdy_to_me?language=en#t-19964