एक नेहमी दिसणारं चित्र आठवा, सुंदर उंच डोंगर, त्यावर हिरवीगार झाडं, वर दिसणारं निळं आकाश, त्यातले काळे पांढरे ढग, थंड हवा
आणि जोडीला भरपूर सारा सर्व प्रकारचा कचरा!!!!!
थोड्याच दिवसांत हेच दृष्य समुद्राच्या तळाशी पण बघायला मिळेल
हि दुर्दैवी वेळ आपल्यावर उशिरात उशिरा यावी म्हणून काही वेडे लोक काम करत असतात,
२ मे २०१६ रोजी बाराकुडा डायव्हिंगचे व्यंकटेश चार्लू यांनी त्यांचे सर्व सहकारी, काही निसर्गप्रेमी, आमच्यासारखे विद्यार्थी, उत्साही लोक या सर्व जणांना हाताशी घेऊन लोकजागृतीसाठी एक मोहीम ठरवली. बोट घेऊन जवळच्याच एका बेटावर जायचं, बेटाचा किनारा, आसपासचा समुद्रतळ साफ करायचा आणि उचलून परत आणून योग्य विल्हेवाट लावायची, अस साधारण स्वरूप होतं या मोहिमेचं. प्रतिसाद उत्तम मिळाला
आता प्रश्न येईल की हा कचरा समुद्राचं, प्राणी, पक्षी, जलचर आणि आपलं माणसांच नुकसान कशा प्रकारे करतो ,
कोणताही कचरा नष्ट होण्यासाठी तो कुठल्या न कुठल्या रुपात जीवाणु, बुरशी, किडे, छोटे प्राणी अश्या कोणत्या न कोणत्या जीवाचं खाद्य बनावं हे गरजेचं असतं, प्लास्टिक, थर्माकॉल ह्या सर्व गोष्टी नैसर्गिक नसल्यानं कोणताही जीव ते खाऊ शकत नाही आणि त्या परिसरात तश्याच पडून राहतात. थोड्या वेळासाठी नव्हे तर शेकडो वर्षं !
याच प्लास्टिक, थर्माकॉलचे नंतर छोटे छोटे तुकडे होतात आणि अन्न समजून छोटे मासे, प्राणी ते खातात.
हेच मासे तुम्ही बाजारातून ते आणुन खाल्लेत तर तुम्हीहि प्लास्टिक खाताय हे निश्चित.
जर चांगले मासे खायचे असतील तर समुद्रात कचरा टाकायचा बंद करा.
बाटल्या, जाळ्यामध्ये अडकून आजवर कित्येक कासवं, सील, समुद्री पक्ष्यांचा मृत्यु झालेला आहे .
हे कासव लहानपणी एका प्लास्टिकच्या रिंगमध्ये अडकलं होतं, बाकी शरीराची वाढ झाली पण रिंग मुळे पाठीचा काही भाग तसाच राहिला आणि आकसत गेलं, पुढे शरीराची वाढ नीट न झाल्यानं हा बिचारा मरून गेला
हा एक दुसरा बिच्चारा प्राणी, रिंग गळ्यात अडकून नकळत गळफास लागला ह्याला
चुक कोणाची शिक्षा कोणाला ?
आता थोडे मोहिमेचे तपशील,
अगदी छोटासा भाग खरं तर आम्ही मोहिमेसाठी निवडला होता पण त्यात सुद्धा इतका कचरा निघाला क मन विषण्ण झालं! १५ पोती भरून कचरा त्या दिवशी आम्ही काढला, कचऱ्याचा प्रकार किती काढला ते खाली देतोय,
प्लास्टिक बाटल्या, डबे व कॅन ३
काचेच्या बाटल्या ४
युज ॲंड थ्रो डिश व कागद १
थर्माकॉल व स्पंज २
धातूचे कॅन ३
रबर व चप्पला १
कपडे १
व्यंकटेशचं खास कौतुक केला पाहिजे एका गोष्टीसाठी, इतर सर्व ठिकाणी स्वच्छता करताना लोक सर्रास प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्या वापरतात, पण व्यंकटेशनं मात्र ह्या वर्षी ज्यूटची आपण नेहमी धान्य भरायला वापरतो तसली पोती आणली होती, प्लास्टिक पिशव्या टाळण्यासाठी केलेली स्तुत्य कृती.
इतकं करूनही काही गोष्टी असतात ज्या आमच्या हातात नाहीत, उदाहरणार्थ नावांमधून गळती होऊन किनाऱ्यावर आलेला ग्रीस आणि डिझेलचा प्रचंड तवंग, प्रवाळ, मासे, छोटे प्राणी सर्वांनाच घातक ठरणारा
खालच्या फोटोमध्ये नावेजवळ ज्या काळ्या रेषा दिसत आहेत ते सर्व तेल आहे,
तेलाच्या तवंगाहुनही अधिक भयंकर अश्या काही गोष्टीदेखील सापडल्या,
पण मित्रांनो,
आमचे प्रयत्न तोकडे आहेत, एका दिवशी तास दीड तास केलेली स्वच्छता फक्त लोकांना समजवायला कामाची आहे. खर उददेश हाच कि लोकांनी समुद्र स्वच्छ ठेवायला शिकावं !
जेंव्हा केंव्हा पुढच्या वेळेस समुद्रावर जाल तेंव्हा प्रयत्न करा की आपल्यामुळे काहीही कचरा पसरणार नाही, इतकीच एक माझी विनंती ऐकलीत तर व्यंकटेश, त्याचे सहकार्यांच्या प्रयत्नाला यश आलं असा अर्थ होईल






